चाणजे परिसरात दलालांचा सुळसुळाट

फसवणूक करून जमीन बळकविण्याचा प्रकार सुरु
उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने सुरु आहे. विविध राष्ट्रीय प्रकल्प येथे कार्यरत आहेत. उरणमध्ये नवनवीन कंपन्या, प्रकल्प येत आहेत, त्यामुळे उरण तालुक्यातील जमिनींना आता सोन्याहून जास्त भाव आले आहेत. याचाच फायदा अनेक दलाल घेत असून, अनेक शेतकर्‍यांना फसवून जमिनी कमी किंमतीने विकत घेऊन जमिनी बळकविण्याचा प्रकार सुरु आहे.
या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दलालांना विकू नये. आपली फसवणूक होऊ शकते. शेतकर्‍यांनी नेहमी सावध राहावे, असे आवाहन चाणजे जमीन बचाव संघर्ष समितीचे दिनेश म्हात्रे यांनी आवाहन केले आहे.
उरण तालुक्यातील चाणजे परिसराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. याचाच फायदा काही शासकीय अधिकारी वर्ग व बिल्डर यांच्या संगनमताने त्यांनी चाणजे परिसरातील जमीन कमीत कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी येथील स्थानिक दलालांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे या परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यामध्ये काही राजकीय नेतेमंडळी ही सहभागी असल्याचे समजते. त्यासाठी बोगस नोटिशी पाठविण्यापर्यंत मजल गेली आहे. सिडकोने अशा कोणत्याही नोटीस काढल्या नसल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. तरी चाणजे परिसरातील सुज्ञ शेतकर्‍यांनी अशा बोगस आमिषाला बळी पडू नये, असे दिनेश म्हात्रे यांनी केले आहे.

बोगस दलालांच्या भूलथापांना बळी पडून जमिनी विकू नका. भविष्यात या जमिनीला सोन्याचा भाव मिळणार आहे. तरी आता कवडीमोल भावाने जमीन विकून उद्ध्वस्त होण्यापासून सावध राहावे.
दिनेश म्हात्रे, अध्यक्ष, जमीन बचाव संघर्ष समित
अधिकारी-बिल्डरांचे संगनमत
या परिसरात प्रति गुंठा 7 ते 8 लाख असताना हे दलाल प्रति गुंठा अवघा 4 लाख रुपये भाव देऊन जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारण, नंतर या जमिनीला भाव 3 ते 4 पट जास्त मिळणार आहे. त्यासाठी काही येथील शासकीय अधिकारी व बिल्डर यांच्या संगनमताने येथे स्थानिक दलाल जमिनी खरेदी करण्यासाठी कामाला लागले आहेत.

Exit mobile version