संरक्षण भिंतींवर काढली अश्लील चित्रे
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील प्राचिन पेशवेकालीन वडाले सरोवर पनवेल महानगर पालिकेने करोड रुपये खर्च करुन सुशोभिकरण केले आहे. मात्र, शनिवारी रात्री तलावाच्या संरक्षण भिंतींवर काही समाजकंटकांकडून अश्लील चित्र काढून परिसर विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तलावाच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुढे आला आहे.
वडाले सरोवरावर सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फेरफटका मारायला ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुले, महिला वर्ग येत असतात. आज ती सर्व काढलेली चित्र सकाळी आलेल्या नागरिक तसेच महिलांच्या दृष्टीस पडली, त्यामुळे मोठा हाहाकर माजला. त्या चित्रावर कापड टाकून झाकण्याचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांनी केला. संरक्षणाकरिता असलेले रायगड सुरक्षा गार्ड होते कुठे, असा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी ताबडतोब रंग आणून रायगड सुरक्षा रक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून त्या सर्व काढलेल्या अश्लील चित्रांवर रंग लावण्यात आला. याठिकाणी संरक्षणाकरिता सकाळी तीन, संध्याकाळी चार तर रात्री तीन गार्ड उपलब्ध असतात. काही वेळा या ठिकाणी गांजा पिणारे मोठ्या प्रमाणावर येत असतात, तर काहीजण वाढदिवसयेथे साजरा करून कचरा येथेच सोडतात, तर सकाळी आयुर्वेदिक रस विकणारेसुद्धा आपला कचरा येथेच टाकून जात असतात. सर्व बाबीचा विचार करुन पालिका प्रशासन उपाययोजनांसाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.