। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने रस्ता सुरक्षा महिना पाळावा म्हणून केंद्रीय स्तरावर सूचना दिल्या होत्या, त्याचा एक भाग म्हणून रस्ता सुरक्षा विषयक कार्य करणारी स्वयंसेवी संस्था सुरक्षा अभियान ट्रस्टने ‘सुपर सेफ्टी मॅन’ नावाचे एक व्यक्तिमत्व तयार करून त्याच्यावरती आधारित कॉमिक बुक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘सुपर सेफ्टी मॅन’ या कॉमिक बुकमध्ये आकर्षक चित्रे आणि आकर्षक लघुकथा आहेत. ज्या रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करतात. रस्ते सुरक्षा जागरूकता, सुरक्षितता तसेच जबाबदार नागरिकांच्या कर्तव्याबद्दल संबंधित 13 लघुकथा यात आहेत. ‘सुपर सेफ्टी मॅन’ हे कॉमिक एक भारतीय सुपरहिरोची ओळख करून देते, जो केवळ रस्ते अपघातांपासून व्यक्तींना वाचवतो असे नाही तर रस्ता सुरक्षा विषयक जागरूकता पसरवून घटनांना प्रतिबंधदेखील करतो आहे. हा उपक्रम केवळ मुलांसाठी नाही तर ते प्रौढांना, रस्ता वापर करणार्या सगळ्यांना गुंतवून ठेवते, रस्ता सुरक्षेविषयी महत्त्वाच्या संवादाला हे कॉमिक बुक सुरुवात करून देते आणि आपल्या जबाबदारीची जाणीव सुध्दा करुन देते. ‘सुपर सेफ्टी मॅन’ हे कॉमिक बुक देशभरात आणि राज्यभरात रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन साहित्य म्हणून वापर करता येईल. सुपर सेफ्टी मॅन हे कॉमिक बुक इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
‘सुपर सेफ्टी मॅन’ हे भारतीय सुपर हिरोचे प्रतीक ठरणार्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे संपादन, लेखन डॉ. विलास पवार यांनी केले आहे. ते सुरक्षा अभियान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. इंग्रजी आवृत्तीचे संपादन लेखन सुरक्षा अभियान ट्रस्टचे सचिव अॅड. विराट पवार यांनी केले आहे. कॉमिक बुकची संकल्पना वीर आर्ट स्टुडिओ यांनी मांडली. ‘सुपर सेफ्टी मॅन’ हे कॉमिक बुक ओम पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. ‘सुपर सेफ्टी मॅन’ या पुस्तकाचे शैक्षणिक संस्थेने आणि सामाजिक संस्थेने प्रबोधन करण्यासाठी ‘सुपर सेफ्टी मॅन’ हे कॉमिक बुक वितरण करावे असे आवाहन ओम पब्लिकेशनच्या प्रकाशक विशाखा पवार यांनी केले आहे.