। वावोशी । जतिन मोरे ।
वावोशी गावालगत असलेल्या डोंगर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या भीषण वणव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत 1 हेक्टरहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले. मात्र, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
डोंगराच्या पायथ्याशी वावोशी गाव असल्याने आग वेगाने पसरली असती, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. वनपाल कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 1 हेक्टरहून अधिक क्षेत्र भस्मसात झाले आहे. वनरक्षक प्रमोद शिंदे, के. एस. खोत, पोलीस पाटील मनीष हातनोलकर आणि ग्रामस्थ हरिदास दरेकर, लक्ष्मण हातनोलकर, हरी पवार यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर गावकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वनविभागाची सतर्कता आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरीही या आगीत मोठे पर्यावरणीय नुकसान झाले आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.