रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परिसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, आर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण देणारा सेबी प्रकल्प तसेच जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदिमुळे रसायनी व परिसराचा नावलौकिक आहे. परंतु, येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.

रसायनी रेल्वे स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या थांबा घेत असतात. या स्थानकावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तर, पावसाळ्यात भिजत गाडीची वाट पहावी लागते. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांची देखील व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्थानकात नसल्याने काही अंतरावर पायपीट करत जावे लागते. रेल्वे तिकीट घरही स्थानकापासून काही अंतरावर असून प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वे गाडी सुटत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, या स्थानकाच्या फलाटालगत वाढलेल्या गवतात सरपटणार्‍या प्राण्यांचा मुक्त संचार देखील दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रसायनी रेल्वे स्थानकावर सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला असताना विविध समस्यांनी ग्रासलेल्या या रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष रहाणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून होत आहे. तसेच, या स्थानकावरील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version