। रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी तीन बाय दोन आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले आहे.
नव्या 55 आसनी अत्याधुनिक बस मार्चपासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब, त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे. अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बससेवांना यापूर्वी गौरविले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान, एसटीच्या सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण 40 प्रवासी इतकी असताना, नव्या बसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल 15 प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे.
राजमाता जिजाऊ हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील.
– प्रताप सरनाईक,
परिवहनमंत्री.
