धरण उशाला, कोरड घशाला!

आंबेगाव धरणाचे आरक्षित पाणी वापराविना पडून

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहराला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असताना आंबेगाव धरणातील 100 टक्के आरक्षित पाणी वापराविना पडून आहे. जलसंपत्ती असूनही नियोजना अभावी ‌‘पाणी असूनही तहान’ अशी पेणकरांची अवस्था झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेत समाविष्ट असलेल्या आंबेगाव धरणातील पाणी पूर्णपणे पेण नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्याचा वापर होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी, एकीकडे धरण पाण्याने भरलेले असताना दुसरीकडे पेणकरांना अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 पूर्वी आंबेगाव धरणातील पाणी परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. विशेषतः दुबार पिकांसाठी हे पाणी उपयुक्त ठरत होते. मात्र, कालांतराने शेतीचे क्षेत्र कमी होऊन त्या ठिकाणी नागरीकरण वाढले. त्यामुळे शेतीसाठीचा पाण्याचा वापर घटला आणि पुढे हे पाणी पूर्णतः पेण नगरपालिकेसाठी राखीव ठेवण्यात आले. तथापि, आरक्षणानंतरही या पाण्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रभावी वापर झालेला नाही. शहरातील अनेक भागांत नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते, तर काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा अत्यल्प वेळेसाठीच होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
स्थानिकांच्या मते, या समस्येचे मूळ कारण म्हणजे अपुरी वितरण व्यवस्था. आवश्यक पाइपलाईन, पंपिंग यंत्रणा आणि सुसंगत नियोजनाचा अभाव असल्याने धरणातील पाणी शहरापर्यंत पोहोचत नाही. परिणामी, उपलब्ध जलस्रोत असूनही त्याचा नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. या पार्श्वभूमीवर पेण नगरपालिकेने तातडीने पाणी वितरण यंत्रणा सक्षम करणे, तसेच जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आंबेगाव धरणातील पाण्याचा प्रभावी वापर सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, ‌‘पाणी असूनही तहान’ ही स्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version