। मळेघर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील खारेपाटाची तहान कधी भागणार हा एक चिंतेचा विषय बनला आहे. कारण या परिसराला पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरण पूर्णपणे गाळयुक्त झाल्याने खारेपाटवासियांचा घसा पाण्याविना कोरडाच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खारेपाट भागात मागील अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापाडा धरणातील पाणी डिसेंबरमध्ये संपते याच कारण पावसाळ्यात पाण्यासोबत गाळाने भरलेले धरण ? मागील दहा बारा वर्षा पुर्वी धरणातील गाळ काढला होतो आत्ता परिस्थिती आशी आहे की धरणात पाणी कमी गाळ जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे जे शहापाडा धरणातील फिल्टरेशन प्लान आहे ते फक्त नाममात्र आहे या मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे काही वर्षांत धरणाचे तळे होण्यास वेळ लागणार नाही.
खारेपाटाला शुध्द, मुबलक व नियामित पाणी पुरवठा होण्यासाठी शहापाडा धरणातील गाळ काढणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वीत होणे, सिडको कडून होणारा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करणे या प्रमुख मागण्यांसह इत्तर मागण्यांची पुर्तता होण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर खारेपाट संघटनेमार्फत बेमुदत उपोषण केले होते.जून संपत आला तरी अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. त्यातच हेटवणे कालवा उपविभागाने काढलेल्या पत्रकानुसार या भागाला आता सहा दिवसांतून एकदा म्हणजेच आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होणार असल्याने खारेपाट भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे.
पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे असून देखील या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे ती कायमस्वरुपी कधी सुटणार याचीच चिंता नागरिकांना लागलेली आहे.
गेल्या दहा वर्षापूर्वी शहापाडा धरणातील गाळ काढला होता. आत्ता गाळ काढण्यासाठी गेल्या वर्षी नवीन प्रस्ताव पाठविला होता पंरतु अजूनपर्यंत गाळ काढण्यासाठी मंजुरी आली नाही.
– श्री. राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी
आता हेवेदावे विसरा खारेपाटातील समाजाने एकत्र राहून यी समस्येवर मात केली तरच पाणी समस्या सुटेल.
– प्रकाश माळी, खारेपाट विकास संकल्प संघटना, अध्यक्ष