अंंबा नदीचे रौद्ररुप; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

। पाली-बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी (दि. 6) अंबा नदीने आपला रुद्रावतार दाखवत धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते. सुधागड जलमय झाल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत देखील तुरळक गर्दी पहावयास मिळत होती. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलाला पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग पाऊस कोसळत राहिला तर सालाबादप्रमाणे पुलावरून पाणी जाऊन दोन्ही बाजूची वाहतूक तासनतास ठप्प होण्याची भीती सतावत होती. तसेच जांभुळ पाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्त्यावर देखील पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
पाण्याचा प्रवाह वाढल्याने अंंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाउस सुरु आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्‍या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर भुस्खलनाने दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पावसाचा जोर वाढत आहे. अशातच वनाच्छदीत प्रदेश असलेल्या व अधिक पर्जनवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जाणार्या सुधागडात पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे सतत कोसळणार्या धुवॉधार पावसाने पाली आंबा नदी पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाकण पाली मार्गावरील अंबा नदी पुल मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. येथील दोन्ही पुलाचे नव्याने निर्माण होत आहे. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता तालुका प्रशासनाने पुर्णपणे खबरदारी घेत पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पाली-सुधागड तहसिलदार दिलीप रायन्नावर व पोलीस निरिक्षक विश्‍वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन दोन्ही पुलांवर नागरीकांना आवश्यक ते सहकार्य करीत होते.

पाली व जांभुळपाडा आंबा नदी पुल वहातुक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वाची भुमिका बजावतात. मुसळधार पाऊस असल्याने पाली अंबा नदी पुलाला पाणी स्पर्श झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.

-दिलीप रायन्नावर, तहसिलदार, पाली-सुधागड
Exit mobile version