नागावच्या पीएनपी शाळेत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात कामगिरी करीत असताना कोणी जिंकेल, कोणी हरेल; पण हताश होऊ नका. कारण प्रत्येक अपयश आपल्याला नवीन गोष्टी शिकवून जातं, काय चुका करू नयेत हे शिकवून जातं. अपयशातुनच यशाचा राजमार्ग मिळतो. तुम्ही फक्त खेळांचा आनंद घ्या, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीची सायरस पुनावाला सीबीएसई स्कुल नागाव येथे दोन दिवसीय दि.10 व 11 फेब्रुवारी दरम्यान स्पोर्ट्स डे, विज्ञान प्रदर्शन आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील, डॉ. चंद्रकांत वाजे, अॅड. भूमी कोळी, नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, मुख्याध्यापिका रसना व्यास आणि इतर मान्यवर, विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रशासनामध्ये शिस्तप्रिय अशी ज्यांची आयपीएस पोलीस अधिकारी म्हणून ओळख आहे, असे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पीएनपी सायरस पुनावाला शाळेचा परिसर, शाळेची इमारत, क्रीडा सुविधा अत्यंत सुंदर आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशी सुंदर व परिपूर्ण शाळा नसेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील अत्यंत तल्लख बुद्धीचे आहेत. ही शाळा, या शाळेतील सुविधा बघून फार आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच दुसर्या दिवशीच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. राजश्री चांदोरकर, डॉ. गणेश गवळी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन दिवसीय विविध क्रिडा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले.
एसपी घार्गे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घार्गे यांनी सांगितले की, आपण मायकेल जॉर्डन यांचे नाव ऐकलेच असेल. मायकेल जॉर्डन यांचे बास्केट बॉलपट्टू म्हणून विश्वात एक खूप मोठं नाव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 9000 शॉट्स हुकवले आणि 300 स्पर्धा हरले. मात्र ते हताश झाले नाहीत. त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरुच ठेवले. त्यामुळे भविष्यात ते प्रचंड यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये कोणी जिंकेल, कोणी हरेल. तुम्ही हताश होऊ नका, कारण प्रत्त्येक अपयश आपल्याला नवीन गोष्टी शिकवून जातं, असा मोलाचा सल्ला सोमनाथ घार्गे यांनी दिला.
–