शेतकरी प्रश्न, आरक्षण अन्‌‍ कायदा सुव्यवस्थेवरून अधिवेशन गाजणार

विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार

| मुंबई | वृत्तसंस्था |

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (7 डिसेंबर) नागपूरच्या विधानभवनात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून बुधवारी विरोधी पक्षातील नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीतर्फे आज (6 डिसेंबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन काळात कोणते मुद्दे ठेवणार याविषयी माहिती दिली.

महिला, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं, या राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. यासाठी राज्यापुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता”, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. सरकारसमोर प्रश्न मोठे आहेत, परंतु अधिवेशाचा कालावधी कमी आहे, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

गरिबी, बेरोजगारीमुळे राज्यात जगणं कठीण झालंय. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत आहेत. सरकार मात्र ‌‘ शासन आपल्या दारी’ मोठा कार्यक्रम करीत आहे. बीडमध्ये दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबडरे मोडले असताना करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारला कणव नाही, हे यातून दिसून आलेलं आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Exit mobile version