मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी!

31 मे पर्यंत बायपास सुरू होणे अशक्य; रेल्वे ब्रिज, गोद नदीवरील पूल व पर्यायी रस्ते अपूर्ण

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव-इंदापूर बायपासच्या कामाबाबत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामधील दरी दिवसें दिवस अधिकच स्पष्ट होत असून, शासन यंत्रणा आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी 31 मे पर्यंत एक लेन सुरू करण्याची ग्वाही दिली असताना प्रत्यक्षात गोद नदीवरील पुलांचे काम सुरूही झालेले नाही, तसेच रेल्वे मार्गावरील मुलाची कामेही अपूर्ण आहेत. तर पर्यायी रस्ते अपूर्ण अवस्थेतच पडून आहेत. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प कागदावर गतीमान दाखवला जात असला तरी वास्तवात कामांचा वेग अत्यंत संथ असून प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर दररोज वाहतूक ठप्प होत असून ‌‘विकासाचा मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग आता नागरिकांच्या हाल अपेष्टांचा प्रतीक बनला आहे.

माणगाव इंदापूर बायपासचे काम गतीमान होईल आणि किमान एक लेन 31 मे 2026 पूर्वी सुरू होईल, असे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात माणगाव व इंदापूर येथील बायपास मार्गावरील अनेक ठिकाणी पूलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. तर काही ठिकाणी पर्यायी रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच असल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. परिणामी या मार्गावर “वाहतूक कोंडी” नव्हे तर “वाहतूक ठप्प” अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाचा समृद्धी मार्ग अक्षरशा ठप्प झाला आहे. बायपासच्या रेंगाळलेल्या कामामुळे 31 मे पर्यंत बायपास वाहतुकीसाठी सुरू होणे अशक्य असून या दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ब्रिज, गोद नदीवरील पुल व पर्यायी रस्त्याची ठिकठिकाणी कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षीही गणेश भक्तांना माणगाव मध्ये व महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

इंदापूर व माणगाव येथे माणगाव बायपास कामाचा भूमिपूजन सोहळा 3 ऑक्टोबर 2025 रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला होता. यावेळी भूमिपूजन सोहळ्यात बायपासचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन काम गतीने पूर्ण केले जाईल, असेही सांगण्यात आले होते. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या आश्वासना नंतरही प्रत्यक्ष प्रगती अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या माणगाव, इंदापूर दरम्यान चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागणे ही नित्याची बाब झाली आहे. विशेषतः शनिवार – रविवार, सणासुदीचे दिवस किंवा सुट्ट्यांच्या काळात तसेच लग्नसराई परिस्थिती अधिकच बिकट होते. होळीच्या काळात खाजगी वाहनांची वाढलेली संख्या, बाजारपेठेतील गर्दी आणि एसटी बसची वर्दळ यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडी मागील प्रमुख कारणे म्हणजे अपूर्ण बायपास रस्ते, गोद नदीवरील पूल, कोकण रेल्वे वरील उड्डाणपूल आणि इतर आवश्यक संरचनात्मक कामे अद्याप पूर्ण न होणे. संबंधित अभियंत्यांच्या मते, ही कामे पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. पावसाळ्यामुळे हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, सध्या सुरू असलेली कामे पाहता 31 मेपर्यंत बायपास सुरू होणे अशक्यप्राय आहे. पुलांचे काम, भराव, सर्व्हिस रोड यांसाठी लागणारा वेळ लक्षात घेता मुदत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे.

प्रत्यक्ष सध्याच्या स्थितीत असणारे बायपासचे काम पाहिले असता तेथील कर्मचाऱ्यांशी व इंजिनिअर कर्मचाऱ्या बरोबर प्रत्यक्ष भेटून आपण स्वतः बातचीत केली असता कमीत कमी एक वर्ष तरी संपूर्ण काम पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे. कारण पावसाळ्यात कामाची गती मंद होते माहितीच्या अधिकारा खाली ही माहिती सांगितली की एक वर्षानंतर बायपास मार्गावरून वाहतुक सुरू होईल, खा. सुनील तटकरे यांनी 31 मे नंतर माणगाव बायपास एकेरी मार्गाने वाहतुकीसाठी खुला होईल असे जाहीर केले. प्रत्यक्षात हे काम खूप ठिकाणी अपूर्ण असल्याने या मार्गाने वाहतूक सुरू होईल अशी शक्यता वाटत नाही.

डॉ. मोहन दोशी,
माणगाव


Exit mobile version