| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चेन्नईच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दरम्यान या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.
येत्या 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमधील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मॉर्न मॉर्केलची भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र आता तो पहिल्यांदाच भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. यापूर्वी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेदरम्यान सपोर्ट स्टाफमध्ये मॉर्केलची रिप्लेसमेंट पाठवण्यात आली होती.
राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आता मॉर्ने मॉर्कल आणि गौतम गंभीर एकत्र मिळून काम करणार आहेत. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मेंटॉरची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी मॉर्ने मॉर्केल हा गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. त्यानंतर गौतम गंभीर आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जोडला गेला. या संघाला त्याने चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. या संघात अभिषेक नायरने देखील त्याच्यासोबत काम केलं, आता अभिषेक नायर भारतीय संघासाठी सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. या तिघांकडून क्रिकेट फॅन्सला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.