सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी, कष्टकरी, कामगार,वंचित आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन रविवारी (दि.2) खालापूरमध्ये साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पुरोगामी विचारांची मेजवानी या मेळाव्याच्या निमित्ताने मिळणार आहे. मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, हजारो कार्यकर्ते सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुरोगामी विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेच्या हक्कांचा प्रखर एल्गार या मेळाव्यात पाहावयास मिळणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी दिली.
खालापूरमधील राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंपाच्या विस्तीर्ण परिसरात मैदानात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याचे हजारो कार्यकर्ते साक्षीदार बनणार आहे. या मेळाव्यातून विचारांची मेजवानी घेऊन संघटना अधिक भक्कम व मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होणार आहेत. पुरोगामी विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेच्या हक्कांचा प्रखर एल्गार या मेळाव्यात पाहावयास मिळणार आहे. कार्यकर्त्यांना याचा आनंद घेता यावा, यासाठी भव्य अशी तयारी करण्यात आली आहे.
कार्यक्रम सुरु होण्याअगोदरच खालापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर हातात लाल झेंडे घेऊन पक्षाचा जयघोष करीत मोठी अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळापर्यंत होणारी ही मिरवणूक ढोल ताशांच्या पथकाद्वारे निघणार आहे. या मिरवणूक असंख्य कार्यकर्ते, महिला, तरुण, तरुणी सहभागी होणार आहेत. कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचल्यानंतर मान्यवरांसह सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनचा इतिहास चित्रफितीद्वारे दाखविला जाणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी दिली.
पाच हजार वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये दहा हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अलिबागपासून पनवेल, पोलादपूर, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक भागांतून कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्वतंत्र अशी पाच हजार वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या वाहनांची वेगवेगळी पार्किंग व्यवस्था असणार आहे. तसेच मोठ्या बससाठी एक स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे शिवानी जंगम यांनी सांगितले.






