| अलिबाग | प्रमोद जाधव |
दीर्घ प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात चार दिवसात सहा रुग्ण सापडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले आहे.
मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातला होता. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणाने जीवाची बाजी लावली होती. मात्र पुन्हा रायगड जिल्ह्यात कोरोनाने मुंसडी घेण्यास सुरुवात केली आहे. चार दिवसांपुर्वी पनवेमध्ये चार रुग्ण सापडले होते. त्यानंतर रोहा व आता पेणमध्ये रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकला, ताप सारखे आजार होण्याची भीती आहे. यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा रुग्णालयासंसह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णांमध्ये खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 1 हजार 234 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ऑक्सीजन बेडसह ऑक्सीजन टाक्यांची व्यवस्था केली आहे. सिलेंडर व व्हेंटिलेटरची तपासणी सुरु केली असून ते देखील सुस्थितीत आहे. तसेच, लागणारे औषधेसुध्दा रुग्णालयात उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची तपासणी नियमित केली जाते. मात्र गेल्या चार दिवसांपासून तपासणीत वाढ केली आहे. सध्या जिल्ह्यात चार जण बाधित आढळून आले आहेत. यातील पाचजण होम आयसोलेशन आणि एक रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सापडलेेले रुग्ण कोरोना बाधित आहेत. कोरोनाचा कोणता व्हेरिअंट आहे, हे अद्याप समजले नाही. त्याची तपासणी प्रयोगशाळेमार्फत सुरु आहे. नागरिकांनी घाबरू जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयात चाचणी नियमित केली जात आहे. सध्या बदलत्या वातावारणामुळे ताप सर्दी खोकला सारखे आजार निर्माण झाले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्ह्यातील रुग्णालयात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे.
डॉ. अंबादास देवमाने
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय