| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दि. 15 डिसेंबर 2025 पासून सर्व ग्राम महसूल व मंडळ अधिकारी आपली डिजिटल सिग्नेचर (डीएससी) तहसील कार्यालयात जमा करून संपूर्ण ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उरण तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारीही हा निर्णय अंमलात आणणार आहेत.
उरण तालुका तलाठी संघाने तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन सादर करून ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेली आयटी उपकरणे बदलून नवीन लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्या असलेली उपकरणे जीर्ण व निकामी झाली आहेत. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, या बहिष्कार आंदोलनामुळे 7/12, 8-अ, दाखला प्रणाली, ई-पीक पाहणी नोंदणी, ई-फेरफार इत्यादी महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांवर तात्पुरता परिणाम होणार आहे. तलाठी संघाची या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सातत्याने होणारा त्रास पाहाता संघाने ऑनलाइन कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
तलाठी संघटनेतर्फे कामकाजावर बहिष्कार
