‌‘शिक्षक अनेक पिढ्यांचा शिल्पकार‌’

| कर्जत | प्रतिनिधी |

आपण कितीही मोठे झालो असलो तरी, आपल्याला दिशा देणारे कोण असतील तर ते शिक्षक असतात. शिक्षक आपल्याला नुसते शिकवत नसतात तर ते आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतात. आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असतात. आपल्याला पुढे जाण्यासाठी संधी देत असतात.

शिक्षक अनेक पिढ्यांचा शिल्पकार असतो. तो स्वतःच्या सुखापेक्षा विद्यार्थ्यांचे हित पहात असतो. विद्यार्थी मोठा झाला की शिक्षकाचे हृदय भरून येते. माझी एकच अपेक्षा आहे की, आपला विद्यार्थी इंग्लिश शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही, असे काम आपल्याला करायचे आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई-बाबा आणि शिक्षकांना कधीही विसरू नका. सुधाकर घारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी शिक्षकांसाठी केलेला सन्मान सोहळा मलाही करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजते.असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती नमिता घारे यांनी येथे केले. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, सभापती नमिता घारे, उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, सुवर्णा ठाकरे, पंचायत समिती सदस्य महेश खारीक, नितीन धुळे, कमला शिंगवा, कविता पादीर, नमिता श्रीखंडे, सुषमा पवाळी, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर बडेकर यांच्यासह विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version