| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील ग्रामीण परिसरात अलिकडच्या काळात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे महाड तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्या दिसण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच मुठवली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता, आणि ती दहशत ताजी असतानाच आता दाभोळ (खलाटी) परिसरात बिबट्याने थेट हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे.
दाभोळ भागातील स्थानिक शेतकरी रामचंद्र पेंढारी यांच्या वाड्यात एकूण पाच गुरे होती. बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व गुरांना चारा घातला आणि त्यानंतर संपूर्ण गाव साखरझोपेत गेले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास एका हिंस्त्र बिबट्याने थेट गोठ्यात घुसून धुमाकूळ घातला. गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांपैकी एका अडीच ते तीन वर्षांच्या निष्पाप कालवडीवर बिबट्याने झडप घातली आणि तिला गळा दाबून जागीच ठार केले. एवढेच नव्हे तर, तो तिला गोठ्यातून बाहेर फरफटत घेऊन गेला. गुरुवारी सकाळी जेव्हा पेंढारी गोठ्यात गेले, तेव्हा त्यांना आपली कालवड गायब असल्याचे दिसले. शोधाशोध केली असता, गोठ्यापासून काही अंतरावर कालवडीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आढळून आला. या थरारक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे वनपाल सचिन विश्वास मेणे आणि वनरक्षक धिरेश थळकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व मृतदेहाचा आणि परिसराचा पंचनामा केला.
पंचनामा करत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना घटनास्थळाच्या आजूबाजूला बिबट्याच्या पंज्यांचे वेगवेगळे ठसे आढळून आले. यात काही ठसे खूप मोठ्या आकाराचे, तर काही लहान आकाराचे होते. यावरून वन्यजीव तज्ज्ञांनी आणि वनविभागाने असा अंदाज वर्तवला आहे की, परिसरात केवळ एकटा बिबट्या नसून, एक मादी बिबट्या तिच्या लहान पिल्लांसह शिकार शिकवण्यासाठी किंवा संरक्षणासाठी फिरत आहे. पिल्ले सोबत असल्यामुळे मादी बिबट्या अधिक आक्रमक आणि धोकादायक बनण्याची शक्यता असते, याच कारणामुळे दाभोळ परिसरातील ग्रामस्थांमधील दहशत दुपटीने वाढली आहे.
दाभोळ परिसरातील घरांची आणि शेतांची रचना विखुरलेली आहे, तसेच आजूबाजूला दाट झाडी आहे. ही भौगोलिक परिस्थिती बिबट्याला लपण्यासाठी आणि पाळीव जनावरांवर दबा धरून अचानक हल्ला करण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे.
आम्ही घटनेचा पंचनामा केला असून पीडित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाडमध्ये एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा असा वावर समोर आल्याने वनविभाग सतर्क आहे. ग्रामस्थांनी रात्री एकटे बाहेर पडणे टाळावे आणि गोठ्यांजवळ प्रखर प्रकाश ठेवावा.
सचिन मेने
(वनपाल अधिकारी)
दोन वर्षांपूर्वीही माझ्या गुरांवर बिबट्याने असाच हल्ला केला होता. आमच्या गोठ्याच्या अगदी बाजूलाच घनदाट जंगल असल्याने येथे वन्यजीवांचा धोका सतत असतो. तसेच परिसरात माकडे आणि डुकरांचाही मोठा वावर आहे. बिबट्याने कालवडीला ठार केल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब दहशतीत आहे. वनविभागाने तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच जंगली श्वापदांपासून कायमस्वरूपी संरक्षणासाठी येथे संरक्षण भिंत उभारून द्यावी.
रामचंद्र पेंढारी
(पीडित शेतकरी, दाभोळ)







