कर्जत तालुक्यातील स्पर्धेला उदंड प्रतिसाद
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका बैलगाडा संघटनेच्या सहकार्याने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खांडपे परिसरातील मैदानावर भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. यावेळी सर्वात महत्वाची प्रेक्षणीय शर्यत पाच लाख रुपयांची होती. ही कल्याणच्या राहुल पाटील यांच्या मथूर बैलाने ओवळे – पनवेलच्या सचिन घरत यांच्या बकसुर बैलाचा पराभव करून जिंकली. या बैलगाडा शर्यतीचा थरार हजारो रसिकांनी अनुभवला. यावेळी 288 बैलगाडा शर्यती झाल्या. हा विक्रमच म्हणावा लागेल.
शर्यतीचे उदघाटन हनुमंत पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच परशुराम घारे, सुधाकर घारे, सरपंच प्रमोद देशमुख, जगदीश देशमुख आदी उपस्थित होते. या शर्यतींना सायंकाळच्या सुमारास खा.सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, आ.सुनील शेळके, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, उद्योजक भगवान भोईर, अंकित साखरे, अशोक भोपतराव, मुकेश सुर्वे, रंजना धुळे, सरपंच प्रभावती लोभी, माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर, माजी पंचायत समिती सदस्य भरत भगत, सुनील भालिवडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी, माझ्या बळीराजाचा खेळ सुरू झाला ही समाधानाची बाब आहे. या शर्यतींचे अगदी नेटके नियोजन झाले असून लोकांना कसे जमवावे हे सुधाकर घारे यांना चांगले जमते. ते विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करतात. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो याचा अनुभव वेळो वेळी येत आहे. यापुढे आपल्याला अनेक स्पर्धांना समोरे जायचे आहे. घारेंनी कोणत्याही स्पर्धांचे आयोजन करावे आमची त्यांना नेहमीच साथ राहील. असे स्पष्ट केले.
अदिती तटकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतच्या शर्यतींपेक्षा रायगड जिल्ह्यातील या शर्यती काकणभर सरस आहेत. असे सांगितले. सुनील शेळके यांनी, इतक्या मोठ्या प्रमाणातील व गर्दीच्या शर्यती मी पहिल्यांदाच पहात आहे.फ असे सांगितले. समीर सोमणे यांनी समयोचित सूत्रसंचालन करून रंगत आणली. याप्रसंगी विलास थोरवे, किशोर पाटील, संतोष जंगम, दीपक श्रीखंडे, मालू निरगुडे, बंडू तुरडे, संतोष बैलमारे, आण्णा घारे आदिंसह मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.