अलिबागच्या दहीहंडी सोहळ्याचा लुटला आनंद
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिस्तबध्द नियोजन, विजेचा झगमगाट, डिजेचा ठेका, सुमधूर गाणी, आणि सर्वांच्या सुरक्षेचा विचार करून उभारली जाणारी शेकाप पुरस्कृत पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या दहीहंडीचा सोहळा रंगतदार ठरला. दुपारपासून सुरु झालेल्या दहीहंडी सोहळ्याचा आनंद गोविंदा पथकांसह उपस्थितांनी व प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांचे पाऊले दुपारी दोन वाजल्यापासून शेतकरी भवन समोर पावले वळू लागली. एका बाजूला संततधार पाऊस सुरु असतानाही 20 वर्षाची ही परंपरा पाहण्यासाठी हळूहळू शेतकरी भवन समोर गर्दी वाढत गेली. दुपारी तीन वाजताच सलामीचा थरार पाहण्याकडे वळू लागले. दरम्यान ढोलताशांच्या गजराने अलिबाग परिसर दुमदुमून निघाला. या गजरामधून त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर दहीहंडी सलामीला सुरुवात झाली. सुरुवातीला अलिबागमधील श्री कानिफनाथ महिला गोविंदा पथकाने सलामी दिली. संध्याकाळपर्यंत 23 महिला गोविंदा पथकापैकी 12 महिला गोविंदा पथकांनी व 9 पुरुष गोविंदा पथकांनी सलामी देऊन 15 हजार रुपयांची बक्षीस जिंकली.
शेतकरी भवन येथे दहीहंडी उत्सव पाहण्यास अलिबाग तालुक्यातून अबालवृद्धांची गर्दी केली होती. उंचावर बांधण्यात आलेली दहीहंडी सुंदर आकर्षक अशा फुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. त्यामुळे अनेकजणांनी ही दहीहंडी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी सहानंतर गर्दी वाढू लागली. हा उत्सव पाहण्यासाठी शेतकरी भवनपासून चेंढर येथील मारुती मंदिरापर्यंत पादचाऱ्यांची रांगच लागली होती. रात्री आठ वाजेपर्यंत शेतकरी भवन समोरील परिसर नागरिकांनी फुलून गेला.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
गेल्या वीस वर्षाची परंपरा असलेल्या अलिबागमधील दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी वेगवेगळ्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील दिग्ग्गज मान्यवरांनी उपस्थिती दाखविली. यावेळी शेकापचे नेते माजी आ.पंडीत पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, ॲड. गौतम पाटील, सतीश प्रधान, अशोक प्रधान, अजय झुंजारराव, ॲड. किशोर हजारे, रवि थोरात, अशोक प्रधान, संजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थितीत होती.
प्रशांत नाईक मित्र मंडळाचे परिश्रम
गेल्या वीस वर्षाची परंपरा असलेला दहीहंडीचा सोहळा दरवर्षी दिमाखात साजरा व्हावा यासाठी प्रशांत नाईक मित्र मंडळाची टीम काम करीत आहेत. यंदाचा दहीहंडी सोहळा आनंदमय व मंगलमय वातावरण साजरा व्हावा यासाठी प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या 160हून अधिक सभासदांनी कंबर कसली. प्रथमोपचारापासून वेगवेगळ्ी दिलेली जबाबदारी प्रत्येकजण चोखपणे बजावत असल्याचे दिसून आले.
गाण्यांसह डिजेच्या ठेक्यावर अनेकांचे पाय थिरकले
दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने डीजे साऊंडची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारपासून सुरु असलेल्या या डिजेच्या ठेक्यावर अनेकांचे पाय थिरकत होते. तसेच याठिकाणी अपर्णा पाटील, आकाश म्हात्रे, नरेश गुल्लू या गायकांनी एकविरा आई, आणि गोविंदाच्या गाण्यांवर गाणी गाण्यास सुरुवात केल्यावर उपस्थित गाण्याच्या ठेक्यावर नाचू लागले. एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
या महिला गोविंदा पथकाने दिली मानाची सलामी
श्री दत्त महिला गोविंदा पथक चेंढरे
साई प्रेरणा महिला गोविंदा पथक पेझारी
जय भवानी महिला गोविंदा पथक वरसोली
श्री संगमेश्वर महिला गोविंदा पथक मुळे – संगमेश्वर
पाचनाका महिला मित्र मंडळ गोविंदा पथक अलिबाग
रणरागिणी महिला गोविंदा पथक कुरुळ
श्री मरिआई मेटपाडा महिला गोविंदा पथक अलिबाग
श्री कानिफनाथ महिला गोविंदा पथक अलिबाग
विघ्नहर्ता गोविंदा पथक पेझारी
शिवसाई महिला गोविंदा पथक पेढांबे