| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने कोळखे गाव येथील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना आयआरबीचे कामगाराना मारहाण करून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी शफिक अकबर अली बोहरा आणि मूर्तजा अकबर अली बोहरा (दोघेही रा. टपाल नाका, एमजी रोड, पनवेल) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळखेगाव येथील महामार्ग क्रमांक 48 येथील पुणे कॉरिडॉर येथे असणारे अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने आयआरबीचे कर्मचारी करत होते. यावेळी दोन इसम कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करत होते. त्यांनी आयआरबीच्या कर्मचार्यांना मारहाण केली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस दिलीप शंकरवार यांनी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्यांनादेखील धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.