उद्धव ठाकरेंची मोदींसह शिंदेंवर सडकून टीका
। नाशिक । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदीजी तुम्ही 4 जूननंतर पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा पीएम केअर फंडचे काय करणार आहात? कुणाच्या हातात तो देणार आहात? तेही सांगून टाका, असे सांगतानाच तुम्ही पंतप्रधान होत नाही. मला भाजपची चिंता वाटते. कारण दोन वर्षानंतर तुम्ही झोळी लटकवून निघून जाल. तेव्हा भाजपची अवस्था काय होईल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. विषय अनके आहेत. किती विषयांवर किती बोलायचं? पण काही गोष्टींवर आवर्जून बोलणे भाग आहे. मोदीजीसुद्धा आज नाशिकमध्ये होते. आता त्यांच्या खरंच मनावर एवढा ताण पडलाय, मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाही. झोपले नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखे बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले, राजकारणाबाबत बोलतोय, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री किती किंमतीचा असेल, हे सर्व नकली संताने. कारण तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून त्यांनी आणखी एक नकली संतान मांडीवर घेतले. ते तर फारच वाह्यात निघाले, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल, असा घणाघात ठाकरेंनी केला.
तसेच, सुरतेचे दोन बोके छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही त्यांना मत काय, किंमतही देत नाही. बाळासाहेब बाळासाहेब बोलू नका. त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणा. ते तुमच्यासारखे नकली विश्वगुरू नव्हते. तुमच्यासारख्या बोगस डिग्र्या घेऊन फिरत नव्हते. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, महाराष्ट्राला वैभव परत आणून दिल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
