वळण ठरतंय अपघातांचे स्थळ

वर्षभरात दहाहून अधिक अपघात

| माणगाव | सलीम शेख |

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथ गतीने होत असतानाच प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे. खड्डे, धूळ, अनेक ठिकाणी दिलेली वळणे यामुळे अपघात होत आहेत. यातच इंदापूर पासून माणगावकडे जात असताना कशेणे गाव ते विघवली गावाच्या मध्यावर पेट्रोल पंपाशेजारी असलेले वळण जीवघेणे ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वळणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हलक्या व अवजड वाहनांचे दहाहून अधिक अपघात या वळणावर झाले आहेत.

कशेणे येथे मुंबई-गोवा महामार्ग बाह्यवळन दिले आहे. इंदापूरकडून जाणारा रस्ता या ठिकाणी मोठ्या वळणाचा आहे. या वळणावरील रस्ता खडबडीत सिमेंट काँक्रेटचा असून मुख्य रस्त्यातला उतार आहे. यामुळे गतीत येणारे वाहन वळणावर नियंत्रित होत नाही. याचा परिणाम या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. अवजड वाहने घसरून मोठे नुकसान होत आहे. आजपर्यंत येथे मोठे ट्रेलर, वायू वाहून नेणारे टँकर व अधिक अवजड वाहनांचे अपघात जास्त झाले आहेत. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या वळणावर अनेक अपघात होत आहेत. वळण असल्याने या ठिकाणी वाहने नियंत्रित होत नाही. वळणामुळे अपघात होत आहेत. या ठिकाणी गतिरोधक किंवा सूचना फलक आवश्यक आहे.

सचिन उभारे, स्थानिक ग्रामस्थ

गेल्या पाच सहा महिन्यात याठिकाणी अवजड वाहने घसरून अपघात झाले आहेत. हे वळण वाहतुकीसाठी योग्य करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सूचना फलक लावले पाहिजेत.

भरत काळे, दैनंदिन प्रवाशी
Exit mobile version