धनशक्तीचा विजय! भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट बहुमतापासून दूर

सत्तेसाठी तडजोडी, सौदेबाजी अटळ

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अखेर पैशाच्या जोरासमोर जनाधार कमी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला जनतेने पूर्ण जनाधार दिलेला नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक जागा मिळवूनही शिंदे गट बहुमतापासून दूर आहे; भाजप आणि राष्ट्रवादीही अपेक्षित संख्येपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी आता तडजोडी, सौदेबाजी आणि पडद्यामागील हालचाली अटळ ठरणार आहेत.

59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ‌‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी रंगलेली लढत शेवटी धनशक्तीच्या बाजूने झुकल्याचे निकालातून स्पष्ट झाले. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला जनतेने पूर्ण अधिकार दिलेला नाही. 59 जागांपैकी शिवसेना 21, भाजप 15, राष्ट्रवादी 16, उबाठा 5 आणि काँग्रेस 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांनी सत्ता कुणालाही पूर्णपणे सोपवली नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत प्रचार, आरोप-प्रत्यारोप, शक्तीप्रदर्शन यांचा धुरळा उडाला होता. मात्र, मतमोजणीअंती मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे दुपारपर्यंत स्पष्ट झाले असून, जनशक्तीच्या समोर धनशक्तीचा विजय झाल्याचे समोर आले आहे.

13 जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात झाली. महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी दुहेरी, तिहेरी, चौरंगी तर काही ठिकाणी पाचपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण 502 उमेदवार मैदानात होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 329 उमेदवारांचा समावेश होता.

7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. 17 लाख 381 मतदारांपैकी 11 लाख 88 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 69.91 टक्के मतदान नोंदवले गेले. सोमवारी (दि. 9) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झाले आणि जनशक्तीला मागे टाकत धनशक्तीचा विजय झाल्याचे अधोरेखित झाले.

Exit mobile version