अतिवृष्टीचा फटका! चिरनेरमधील घराची भिंत कोसळली

। उरण । प्रतिनिधी ।
गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका उरण तालुक्यालाही बसला. अतिवृष्टीमुळे चिरनेर येथील संतोष नाना म्हात्रे यांच्या घराची भिंत बुधवारी (दि.17) दुपारी 1.30 च्या सुमारास कोसळली.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. दरवर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसुन येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चिरनेर येथील रहिवासी संतोष म्हात्रे यांच्या घराचेही सततच्या पावसामुळे नुकसान झाले. ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर यांनी घराची पाहणी केली. दरम्यान अतिवृष्टीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या संतोष म्हात्रे यांना प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या घराचे पंचनामे सादर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी असून चिरनेर येथील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, इंटकचे उरण तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी केली आहे.

Exit mobile version