महिलेची बाळंतपणासाठी धावपळ

रस्त्याअभावी वाहन जात नसल्याने डोलीतून प्रवास
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी वन विभाग रस्ता तयार करून देत नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासी लोक आपली पायवाट श्रमदान करून तयार करतात. मात्र पावसाळयात श्रमदान करून बनवलेल्या रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला आहे. दरम्यान,रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहने ये जा करू शकत नाहीत आणि त्यामुळे आसलवाडी मधील गरोदर महिलेला डोली करून जुम्मापट्टी पर्यंत न्यावे लागले. माथेरानच्या पायथ्याशी 12 आदिवासी वाड्या असून त्या आदिवासी वाड्या वन जमिनीवर वसल्या आहेत. वन विभागाच्या दली भूखंडावर उभ्या राहिलेल्या या आदिवासी वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता वन विभाग करू देत नाही आणि त्यामुळे आदिवासी वाड्यांमध्ये राहणार्‍या लोक दरवर्षी श्रमदान करून रस्ता तयार करतात. मात्र तो रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो आणि त्यामुळे पावसाळ्यानांतर कोणत्याही प्रकारची वाहने आदिवासी वाड्यांपर्यंत जाऊ शकत नाहीत. जुम्मापट्टी पासून धनगर वाडा ते आसलवाडी हा रस्ता वाहून गेला असून असालवाडी या 60 घरांची लोकवस्ती आहे. हा श्रमदानातून बनवलेला रस्ता पूर्णपणे वाहून घेतलेला आहे. यामुळे येथे वाहने जाऊ शकत नाही. असालवाडी मधील बेबी गणपत दरवडा या 22 वर्षीय विवाहित महिलेला बाळंतपणासाठी बुधवारी (दि.10) सकाळी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणायचे होते. बेबी दरवडा यांच्या पोटात कळा वाढू लागल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांचे कुटुंबीय यांनी अखेरचा पर्याय म्हणून सकाळी सात वाजता चादरीच्या कपड्याची डोली केली आणि त्या डोलीतुन गरोदर महिलेचा असालवाडी ते जुम्मापट्टी असा प्रवास सुरु झाला. साधारण तीन किलोमीटर आल्यानंतर गरोदर महिलेला रिक्षातून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्या महिलेला गणपत दरवडा, काशिनाथ दरवडा, महेश सांबरी, नारायण पारधी, संदीप सांबरी यांनी मदत केली.

Exit mobile version