शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या लढाऊ नेत्या, झुंजार पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मीनाक्षी पाटील सर्व महाराष्ट्राला सुपरिचित होत्या. कै. ना.ना. पाटील यांची नात, भाई प्रभाकर पाटील यांची कन्या, आमदार दत्ता पाटील यांची पुतणी असा वारसा लाभलेल्या या रायगड कन्येला सामाजिक, राजकीय सांस्कृतिक जीवनाचे बाळकडू अगदी लहान वयापासून मिळाले होते. याशिवायही एक स्वतंत्र, तडफदार व अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व म्हणून आपले वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले होते. शेतकरी कामगार पक्षाची शेतकरी, कामगार, सामान्य माणूस व महिलांसाठी लढे देण्याची जाज्वल परंपरा, राजकारणात सक्रीय कार्य करीत, मीनाक्षी पाटील जागवीत आल्या होत्या. मीनाक्षीताई यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे सर्व थरातील जनतेशी संवाद त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न योग्यरित्या विधिमंडळात मांडून त्यांना ते सोडविण्यात यश आल्याचे सर्वश्रुत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्या सतत सभागृह गाजवीत होत्या. सीमा प्रश्नावरुन झालेल्या महाराष्ट्रातील चळवळीत पोलिसांचे कडे तोडून मीनाक्षी पाटील यांनी जी धडक मारली ती सरळ कौन्सिल हॉलच्या व्हरांड्यातच! जगन्नाथ मिश्र यांनी आणलेल्या बिहार प्रेस विधेयकाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील पत्रकारांनी केलेल्या आंदोलनात हरसूल येथील तुरुंगात जाणार्या देशातील त्या एकमेव स्त्री पत्रकार! उरणच्या क्रांतिकारी लढ्याने त्यांना घडविला येरवड्याचा तुरुंग! भाववाढ रोखण्यासाठी पक्षाने केलेल्या चळवळीत त्यांनी पार पाडलेली महत्त्वाची भूमिका ती महिला आघाडीच्या नेत्या म्हणून! पत्रकारितेचा ‘दर्पण’ पुरस्कार मिळविणार्या त्या पहिल्या महिला पत्रकार! पत्रकार संघाच्या राज्य व जिल्हा पातळीवरील अनेक संस्थांवर त्यांनी महत्त्वाचा पदभार सांभाळला. नव्हे, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी राजकारण आणि समाजकारणाचा वसा सांभाळला होता. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक सभा आणि शिबिरात त्यांनी सक्रीय भाग घेतला व अन्यायाचे निराकरण केले. इतकेच नव्हे तर, एक अभ्यासू, लेखिका म्हणूनही त्या महाराष्ट्राला परिचित होत्या. त्यांनी लिहिलेले अनेक अभ्यासपूर्ण लेख आजही वाचकांच्या संग्रही आहेत! अलिबाग येथे ‘रामनारायण पत्रकार भवन’ उभे राहिले ते केवळ त्यांच्या अथक परिश्रमामुळेच! विविध महिला समित्या व पत्रकार संघटनांच्या अनेक शासकीय व बिगर शासकीय समित्यांवर त्यांचा सक्रीय सहभाग होता.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्यही फार प्रशंसनीय आणि महत्त्वाचे होते. पोयनाड येथील पिरोजबाई बारिया प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महिला वरिष्ठ महाविद्यालय यांच्या स्थापनेत व विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एवढेच नव्हे तर, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अडचणी सोडविण्याकडे त्यांचे सतत लक्ष असे. गरीब, होतकरु व अभ्यासू विद्यार्थ्यांना विविध संस्थांमार्फत मदत करण्याच्या व साहित्य वाटप करण्याच्या कामी त्या अग्रेसर असत. महाराष्ट्र राज्यात त्या जिल्हा परिषदेतील अभ्यासू विरोधी नेत्या, वक्त्या व जाणकार म्हणून ओळखल्या जात. जि.प.च्या नियमांची काटेकोर जाण, नेमकी व समर्पक भाषा, प्रश्नांचा सांगोपांग विचार व तपशीलातील मोजकेपणा व त्याचबरोबर व्यवहारातील दक्षता यामुळे त्यांचे जि.प.तील कार्य नजरेत भरण्यासारखे, प्रशंसनीय व उल्लेखनीय होते. त्यांचे कार्य समग्र महाराष्ट्रात आदर्शवत ठरले आहे. विधानसभेत मीनाक्षी पाटील एकूण तीन वेळा निवडून गेल्या. विधानसभेतील त्यांची कामगिरी उल्लेखनीय व अभिमानास्पद अशी राहिली.
1995 ला विधानसभेत त्या पहिल्यांदा निवडून गेल्या. त्यानंतर 2000 साली दुसर्यांदा. याच काळात त्यांनी बंदरे व मत्स्य विभागाचे राज्यमंत्रीपद भूषविले. खात्याला त्यांनी जाण आणली. कोकणाच्या संपूर्ण सागर किनारी बंदर विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे निर्णय घेतले. मत्स्य विभागात कोळी बांधवांच्या हिताचे अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यात मासे उतरविण्याचे लॅन्डींग सेंटर, परदेशी मत्स्य व्यावसायिकांची हकालपट्टी, स्थानिकांना अभय, मच्छिमार जेटीवर मूलभूत सुविधा, डिझेलवरील सेल टॅक्स माफ, सुशिक्षित बेरोजगारांसाठी खाडीलगतची जागा मत्स्य व्यवसायासाठी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. गावोगावी मत्स्य तलाव निर्माण केले. महाराष्ट्रातील पहिला ग्रोएन बंदर, तसेच कोकणाप्रमाणे विदर्भातील मच्छिमार बांधवांचे मत्स्य तलाव त्यांना परत मिळवून देऊन त्यांनी पिढीजात मत्स्य व्यवसायाला कोकणाचा 720 कि.मी. लांबीच्या सागरकिनारी नीलक्रांती घडवून आणली! विधिमंडळातील एक अभ्यासू आमदार म्हणून मीनाक्षी पाटलांनी अलिबागचे नाव नेहमीच उज्ज्वल केले. आज मीनाक्षी पाटलांमुळेच अलिबाग तालुका टँकरमुक्त आहे. जवळजवळ 99 टक्के विद्युतीकरण आहे. मूलभूत सुविधा देण्यामध्ये आणि अलिबागच्या सर्वांगीण विकास करण्यात मीनाक्षी पाटील नेहमीच यशस्वी झाल्या आहेत.
‘उतणार नाही, मातणार नाही, घेतल्या वसा टाकणार नाही.’
अस विधानसभेत प्रवेश करताना जनतेला दिलेले अभिवचन त्यांनी निश्चयपूर्वक पार पाडले आहे. विनय, सशीलता अहंकारमुक्त अशा ताईंनी नेहमीच जनतेच्या हृदयावर राज्य केले. अशा या ताईंचा आम्हा सार्यांनाच अभिमान आहे. जगातील श्रमिकांनो एक व्हा. गमविण्यासाठी गुलामगिरीच्या बेड्या आहेत. परंतु, जिंकण्यासाठी उभ्या जगाचे राज्य आहे. असे ताई नेहमी करत असलेले आवाहन आम्हाला आज स्फूर्ती, नवी ऊर्मी देऊन जाते.
ताईंना अखेरचा लाल सलाम !