मोठ्या भावाने दिलेला शब्द छोट्या भावाने पाळला; धोंडसे शाळेचा पोषण आहार शिजवण्याचा मार्ग सुकर
। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील धोंडसे येथील हभप किरण कुंभार यांनी आपले दिवंगत लहान भाऊ अमोल कुंभार यांनी धोंडसे शाळेला दिलेला शब्द पाळला आहे. स्वातंत्र्य दिनी मंगळवारी राजीप धोंडसे शाळेला गॅस कनेक्शनसह शेगडी आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामुळे धोंडसे शाळेचा पोषण आहार शिजवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक गोरख आघाव यांनी सांगितले की, धोंडसे गावात सांप्रदायिक कुटुंबात जन्मलेले कै. अमोल कुंभार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अमोल यांनी अगदी कमी वयातच स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. ते नाडसूर ग्रूप ग्रामपंचायतीचे सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य होते. शालेय पोषण आहार योजना अंतर्गत शाळेत जेवण शिजवण्यासाठी इंधन भेटत नाही हे स्वतः कै. अमोल कुंभार यांनी पाहिले होते. तेव्हाच त्यांनी मुख्यध्यापक गोरख आघाव यांना सांगितले होते, मी माझ्या मुलाला शाळेत दाखल करताना शाळेला गॅस कनेक्शन शेगडी भेट देईन, अशी त्यांची इच्छा होती. परंतु नियतीने तो दिवस त्यांना दाखवला नाही. शेवटी नियातीपुढे कोणाचं काही चालत नाही. त्यांच्या छोट्या भावाने रायगड भूषण ह.भ.प किरण महाराज यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांची इच्छा पूर्ण करुन शाळेला गॅस कनेक्शनसह शेगडी भेट दिली.
या कार्यक्रमास गावातील आजी माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, स्वदेस समिती, शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गोरख आघाव यांनी केले.