जिल्हा कारागृहात मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जपत पिठाची चक्की व स्वच्छता गृहासाठी दरवाजे उपलब्ध करून दिले आहेत. माणूस म्हणून जिल्हा बँकेने केलेले काम खर्या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले आहे.
अलिबागमधील जिल्हा कारागृहात शनिवारी (दि.31) पिठाची चक्की लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सहकार क्षेत्रात उत्तूंग कामगिरी करणार्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कारागृहात अद्ययावत अशी पिठाची चक्की, स्वच्छतेसाठी डस्टबीन आणि स्वच्छतागृहाचे 12 दरवाजे भेट देण्याचे काम करण्यात आले आहेत. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर, कर्जदेखरेख विभागाचे मुख्य व्यवस्थापक संजीव देशमुख, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र ननावरे, तुरूंग अधिकारी शशीकांत निकम, तुरूंग अधिकारी किशोर वारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांचे स्वीय सहाय्यक राजू पवार व इलेक्ट्रिशन विष्णू राऊतराय यांच्यासह जिल्हा बँकेतील कर्मचारी, कारागृहातील कर्मचारी, बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पिठाच्या चक्कीचा लोकार्पण सोहळा अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुहास वारके, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती अशोक कारकर यांनी दिली. जिल्हा बँकेमार्फत सामाजिक बांधिलकीतून देण्यात आलेल्या या मुलभूत सुविधांबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांच्याकडून कौतूक करण्यात आले.
जिल्हा बँकेची कारागृहाला मदत
अलिबागमधील जिल्हा कारागृहात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाला दरवाजे नव्हते. त्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात आली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांच्या मागणीनुसार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामाजिक बांधिलकी जपत 12 दरवाजे बसवून देण्याचे काम केले आहे. जिल्हा बँकेने कारागृहातील बंद्यासाठी मदतीचा हात दिल्याने त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.