प्रसारमाध्यमांकडून कामाची पोलखोल
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात साधारणतः 15 वर्षांपूर्वी भूमीगत विजेच्या तारा फिरवण्यात आल्या होत्या. लाखो रुपये खर्च करुन झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासियांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी या कामाची पोलखोल केल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीअंती काम इस्टिमेंटप्रमाणे न झाल्याचे आढळून येऊन पूर्ण काम निकृष्ट दर्जाचे आहे हे सिद्ध झाले.
तत्कालीन ठेकेदाराला शासनाने काळ्या यादीत टाकले आणि हजारो रुपये शासनाचे पाण्यात गेले. त्यानंतर पेण शहरात भूमीगत विजेच्या तारांचे काम झाले नाही; परंतु आता सामाजिक न्याय विभागाकडून राखीव वस्तीसाठी भूमीगत विजेच्या तारांचे काम आले असून, हे काम ठेकेदार मनमानेल तसे करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या भूमीगत विजेच्या तारांचे काम करताना स्थानिक प्रशासन म्हणजे नगरपालिकेकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, ती परवानगी घेतलेली नाही. तसेच ठेकेदाराने या भूमीगत विजेच्या तारा टाकण्यासाठी जी खोदाई केली आहे, ती इस्टिमेंटप्रमाणे झालेली नाही. तसेच पेण शहरातील पाण्याची मुख्य पाईपलाईनच्या शेजारून या विजेच्या तारा टाकण्यात आलेल्या आहेत. भविष्यात जर विजेच्या तारांमध्ये काही दोष निर्माण झाल्यास पाईपलाईनवर काम करणार्या नगरपालिकेच्या कर्मचार्यांचा जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तसेच भूमीगत तारा तपासल्याची कोणतीही माहिती ना महावितरण कंपनीकडे, ना नगरपालिकेकडे. महत्त्वाची बाब म्हणजे, भूमीगत तारांचे काम करत असताना या विजेच्या तारा विशिष्टप्रमाणे तपासून त्याचा रिपोर्ट घेऊन नंतरच इस्टिमेंटमध्ये दिलेल्या आराड्यानुसार जमिनीमध्ये टाकायच्या असतात. पाईपलाईन ज्या भागात टाकायची आहे, त्याची खोदाई तीन ते साडेतीन फूट करणे गरजेचे असते, नंतर विजेच्या तारा टाकत असताना खालच्या बाजूने खडी, त्यानंतर अर्धगोळाकार पाईप, रस्ता क्रॉसिंग असेल त्या ठिकाणी सिमेंटच्या फरशा पाईप वरून टाकणे गरजेचे असते. परंतु, अशा प्रकारच्या विजेच्या तारा कोठेही जमिनीत टाकलेल्या दिसत नाहीत. याचाच अर्थ, पेण शहरात ज्या विभागात या विद्युत तारांचे काम सुरू आहे, ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे व इस्टिमेंटप्रमाणे सुरू नाही.
ठेकेदाराचे मनमानी काम
याबाबत महावितरण कंपनीचे पेणचे उपअभियंता खोबरागडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या कामाशी आमचा संबंध नाही. तरीही मी माझ्या कनिष्ठ अधिकार्यांकडून माहिती घेऊन आपल्याशी बोलतो. तर, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाने नगरपालिकेला कळविले आहे; परंतु रितसर कोणतीही एनओसी घेतली नाही. एकंदरीत, ठेकेदाराला जसं वाटतं, तसं तो काम करतोय. मात्र, भविष्याचा विचार करता हे काम सदोष झाले नाही तर भविष्यात पेणकरांना अनेक बाबींना सामोरे जावे लागेल.