गावात भितीचे वातावरण; तरुणांचे कौतुक
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड येथे शनिवारी (दि. 14) रात्री डी.जे.बाळा यांच्या घरासमोरील रस्त्याच्या कडेला पाच फुटी मगरीचे पिल्लू आढळून आले. त्या मगरीच्या पिल्लाला खांदाड येथील तरुणांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मोठ्या शिताफीने आणि धाडसाने पकडले आणि रात्री लगेचच काळ नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले. या तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या तरुणांच्या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे.
खांदाड गावातील बाबळ या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या डोहात खूप पाणी साचले आहे. मागीलवर्षी खांदाड गावात काळ नदीच्या पुराचे पाणी भरले होते. हे गाव नदीच्या काठावर वसलेले आहे. काळ नदीच्या पात्रातील एक मोठी मगर या तुंबलेल्या पाण्यात गतवर्षी अडकून पडली होती. याबाबत वनविभागाला नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सतर्क केले होते. मात्र, या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र, यावर्षी त्या मगरीला 7-8 पिल्ले झाली आहेत. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरी अन्नाच्या शोधात जवळच असलेल्या घराजवळ येत असतात. अशीच एक मगर घराजवळ येताना एका तरुणाला दिसली. त्यामुळे शेजारी असलेल्या घराघरात भितीचे वातावरण निर्माण झाले. सर्व लहान मुलांना सायंकाळी घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व तरुणांनी एकत्र येत या मगरीच्या पिल्लाला दोन तासांच्या मेहनतीनंतर जीवाची पर्वा न करता पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ तूर्तास टळला आहे. त्यानंतर या मगरीला काळ नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले. मात्र या मगरीमुळे खांदाड गावात भितीचे वातावरण आहे. ही मगर घराजवळ पकडल्याने तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, खांदाड गावातील मगरींचा तातडीने बंदोबस्त करुन त्यांना इतरत्र सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी वनविभागाकडे केली आहे.