। उरण । वार्ताहर ।
अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रन च्या घटना उरण तालुक्यात वारंवार घडत आहेत. अशीच एक अपघाताची घटना शनिवारी (दि. 07) घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला आहे. तर, अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
उरण तालुक्यातील वेश्वी येथील रहिवाशी विकास अनंत मुंबईकर हे आपल्या दुचाकीने वेश्वी ते तिघोडे जात होते. त्याचवेळी क्रिस्टल यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हि घटना शनिवारी (दि. 07) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच, हा अपघात पूर्ववैमनस्यातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबईकर कुटुंबीयांनी केली आहे.