नऊ जण जखमी
। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा रिस परिसरात भटक्या श्वानांसह पिसाळलेल्या श्वानांनी दहशत निर्माण केली आहे. परिसरात रस्त्यावरुन जात असताना पिसाळलेले कुत्रे अंगावर धावून जखमी करत असल्याने भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे. मागील आठवड्यात मोहोपाडा परिसरात तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी रिस गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी तब्बल नऊ जणांना जखमी केले.
परिसरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या ग्रुपचा वावर दिसून येत आहे. ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी हे कुत्रे मोठमोठ्याने भुंकत आहेत व येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागत आहे. त्यामुळे दुचाकी चालवत असताना दुचाकीस्वाराचा पुढे धडक बसून अपघात होण्याची शक्यता असून, नागरिक या भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहेत. एवढ्या कुत्र्यांचा ग्रुप मोहोपाडा रिस परिसरात कसा काय आला? यांना कोण आणून सोडतो का? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.