चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीतील वीरेश्वर मंदिरातील धाडसी चोरीचा अवघ्या चार दिवसांत उलगडा करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीला गेलेले सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादनही लवकरच हस्तगत होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

18 जुलै रोजी पहाटे तीन वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी वीरेश्वर मंदिरात प्रवेश करून शिवपिंडीवरील सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरून नेले होते. या घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

खोपोली पोलिसांच्या तीन विशेष पथकांनी रात्रंदिवस तपास करत तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे आरोपींचा माग काढला. या तपासादरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून दोन, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथून दोन अशा एकूण चार आरोपींना 21 जुलै रोजी संध्याकाळी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल सुरेश कसबे व विलास साहेबराव आगीवाले रा. शिरूर, जि. पुणे तसेच दिलीप राजू जाधव व सखाराम छबन गायकवाड रा. पारनेर, जि. अहिल्यानगर यांचा समावेश आहे. चौघांनाही पुढील तपासासाठी खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीला गेलेले 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन लवकरच जप्त करण्यात येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन मंदिर विश्वस्तांशी चर्चा केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, खालापूर पोलीस, रसायनी पोलीस, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह रायगड पोलिसांची आठ पथके तपासात सहभागी होती. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील खोपोली पोलिसांच्या तीन पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात आल्याने भाविकांनी खोपोली पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version