। महाड । वार्ताहर ।
वाजत-गाजत आलेल्या देव-देवतांच्या पालखी मिरवणुका, भाऊ-बहिणींच्या भेटीगाठी, नाचवल्या जाणार्या लक्षवेधी सासणकाठ्या आणि जत्रेत खरेदीसाठी झालेली प्रचंड गर्दी, अशा उत्साही वातावरणात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाडमधील श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना साजरा करण्यात आला. रायगड पोलीस दलाकडून वीरेश्वर महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
छबिनोत्सवात रात्री भरलेल्या जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापार्यांकडून सांगण्यात आले. वीरेश्वर महाराजांच्या सजवलेल्या गाभार्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या उत्सवाची रविवारी सकाळी कीर्तनाने सांगता झाली. पहाटे वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये झोलाईदेवीच्या मानाच्या पालखीचे विन्हेरे गावातून आगमन झाले. या वेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते. विन्हेरे ते महाड हे 21 किलोमीटर अंतर चालत आणि झोलाई मातेचा जयजयकार करत पालखीचे शहरातील भोईघाटावर आगमन झाल्यानंतर देवीचा गोंधळ आणि भंडारा उधळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामदेवतांच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे वीरेश्वर महाराजांची पालखीही मिरवणुकीत सहभागी झाली होती. नाते गावचे ग्रामदैवत रवळनाथांची पालखीही यात सहभागी झाली होती. भाविकांनी पायघड्या घालून वीरेश्वर मंदिरात झोलाईची पालखी आली. त्यानंतर ओटी भरण्यासाठी सुवासिनींनी गर्दी केली होती.
वीरेश्वर महाराजांच्या उत्सवाला लाखो भाविक येतात. जत्रेत अगदी सुई -दोर्यासारख्या अशा लहान-सहान वस्तूंपासून गृहोपयोगी वस्तूंची शेकडो दुकाने सजलेली होती. दिवसेंदिवस वाढत जाणार्या महागाईने अनेकांचे बजेट कोलमडलेले असतानाच महाडच्या छबिन्यात मात्र किमती आवाक्यात असल्याने ग्राहक आवर्जून खरेदी करतात. महिलांकडून बेगमीची खरेदी केली जाते. यंदा जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालीच, परंतु कमी दराने वस्तू उपलब्ध झाल्याने महिलावर्गाने सढळ हस्ते खरेदी केली. पर्स, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, कुर्ती, बेडशीट, टॉवेल, पडदे, गॉगल, मोबाईल कव्हर, लहान मुलांचे कपडे आदी सर्वच प्रकारच्या वस्तूंची ग्राहकांनी मोठी खरेदी केली. याशिवाय खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही गर्दी होती.