। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका कोरोनाबाधित महिलेच्या शरीरावरील दागिने चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर ही घटना उघडकीस आली. याबाबत मृत महिलेच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. मृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेत तत्काळ सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा एका कंत्राटी कामगाराने या बांगड्या चोरल्याचे उघडकीस आले आहे.
त्या कामगाराकडे चोरीचे दागिने मिळाले असून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सुलोचना गुणाजी पाटील (वय 86, रा. पाली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरी झाल्याची तक्रार त्यांची नात समीक्षा रामदास पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात केली होती. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही तक्रार करण्यात आली होती.रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतर कंत्राटी कामगाराने बांगड्या चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या बांगड्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. मात्र या चोरीबद्धल संबंधितावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.