लाडकी बहीण तुपाशी, विद्यार्थी उपाशी

xr:d:DAFwSAlgT3s:1099,j:8493074430524497638,t:23120610

मध्यान्ह भोजनासाठी निधीच नाही

| पेण | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करुन भरभरून लाडक्या बहिणींची मते घेतली. मात्र, लाडक्या बहिणींना पैसे देत असताना मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे गायब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून मध्यान्ह भोजन आहारासाठी निधीच आलेला नाही, त्यामुळे गेली पाच महिने मध्यान्ह भोजन आहार देणार्‍या बचत गटांची मोठी तारांबळ उडालेली आहे. ना वेळेवर धान्य येत, ना निधी. त्यामुळे बचत गटांनी उसनवार करुन आजपर्यंत मध्यान्ह भोजन आहार पुरविला. परंतु, आता त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले असल्याने येत्या आठ दिवसांत शासनाकडून निधी दिला नाही, तर पूर्ण पेण तालुक्यातील मध्यान्ह भोजन आहार बंद केले जाणार असल्याची माहिती बचत गटांच्या संघटनेकडून सांगण्यात आली आहे.

मागच्याच महिन्यात राज्य शासनाने फक्त शो शायनिंग करुन मध्यान्ह भोजन आहार पुरवणार्‍या बचत गटांची झाडाझडती घेऊन त्रास देण्याचे काम केले. मात्र, त्यांना निधी उपलब्ध नाही, याविषयी चर्चा करणेदेखील या कमिटीने टाळले. जेव्हापासून लाडकी बहीण योजनेला शासनाने पैसे फिरवले आहेत, तेव्हापासून मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी एकही रुपाया शासनाकडून वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात पेण तालुक्यातील मध्यान्ह भोजन योजना बचत गटाने बंद केल्यास हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, याला जबाबदार कोण असेल? हा मोठा एक गहन प्रश्‍न आहे. लाडक्या बहिणींच्या प्रेमात शासन चिमुकल्या विद्यार्थ्यांना विसरले, हेच खरं.

सप्टेंबरपासून मध्यान्ह भोजन आहारासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे या योजनेची बिल देता आली नाहीत. मात्र, आम्ही मागणी केली आहे, लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल.

श्रीकांत मोरे,
लेखा अधिकारी, रा.जि.प.

Exit mobile version