कोसळलेले घर सावरताना डोळ्यांमध्ये अश्रू
। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यामधील विविध गावांमध्ये गेली दोन वर्षात अनेकांची घरे अतिवृष्टीमध्ये कोसळली मात्र, प्रस्ताव पाठवूनदेखील अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे कोसळलेले घर सावरताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. वारंवार तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारुनही हातात काहीच आलेले नसल्याने पदरी निराशा पडली आहे.
महाड तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यातच अधून-मधून अवकाळी पावसामुळे पूरती दाणादाण उडून जाते. अनेक वेळा शेजारच्या गावात पाऊस पडत नाही. मात्र, दुसर्या गावामध्ये मुसळधार पाऊस पडून घरांचे नुकसान होत. अशा परिस्थितीत शासन नियमावर बोट ठेवून मदत करण्यास हात वर केला जातो. महाड तालुक्यामध्ये 2022 पासून सुमारे 54 घरांचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानग्रस्तांना अद्याप कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
महाड महसूल कार्यालयाने 2022 मधील नुकसानग्रस्त लोकांची यादी आणि निधीसाठी प्रस्ताव पाठवून दिलेला आहे. यामध्ये 1500 हजारपासून लाख रुपयांपर्यंत नुकसानीचा पंचनामा झालेला आहे. याबाबत अनेक नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी घर बांधून मिळावे किंवा कोसळलेल्या घराला पुन्हा उभे करण्यासाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महसूल कार्यालयाच्या अनेक फेर्या मारल्या. महसूल कार्यालयाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे एवढेच उत्तर देण्यात येत आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या आणि ग्रामस्थांच्या स्वखर्चातून घर उभे करताना डोळ्यांमध्ये पाणी दाटून येत आहे.
महाड तालुक्यामध्ये 2021 मध्ये महापूर आला होता. यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर 2022 मध्येदेखील कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाचादेखील समावेश आहे. अवकाळी पाऊस होत असताना शासनाकडून पावसाचा निकष लावला जातो. यामुळे वादळी वार्यामध्ये घर कोसळूनदेखील घरासाठी तत्काळ मदत दिली जात नाही. नुकसानग्रस्त नागरिकाचे समाधान करण्यासाठी तलाठी पंचनामा केला जातो आणि झालेल्या नुकसानीचा तपशील तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनमधून निधी मिळण्याकरता प्रस्ताव पाठवला जातो.
गेली दोन वर्ष झाले तरी अद्याप या प्रस्तावाला सकारात्मक उत्तर मिळालेले नाही.
तालुक्यातील गोठे गावातील मांजरेकर यांचे घर कोसळले होते. घरात एकच व्यक्ती असल्याने आणि घर पुन्हा उभे करण्यासाठी परिस्थिती बेताची नसल्याने यावर्षी मांजरेकर यांनी गळक्या घरातच मुक्काम ठोकला होता. मात्र, घरातील ओलाव्याने अखेर आजारी पडून मांजरेकर यांनी शेवटचा श्वास घेतला. तरीदेखील त्याचे घर उभे राहिले नाही. त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून शासनाने घराच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी विनंती राजेंद्र मांजरेकर यांनी केली आहे. अशीच अवस्था तालुक्यातील अनेक जणांची आहे. घर बांधण्यास पुरेसे पैसे नसल्याने आजही कोसळलेली घरे अपूर्णा अवस्थेत आहेत. शासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन कोसळलेल्या घरांना निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणीदेखील होत आहे.
सन 2022 मध्ये तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामध्ये कोसळलेल्या घरांना निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जवळपास 54 नुकसानग्रस्त ग्रामस्थांचा यात समावेश आहे.
– महेश शितोळे, तहसीलदार महाड