| पेण | प्रतिनिधी |
अलिबाग वनविभाग पथकाला मिळालेल्या माहितीनूसार, मुंबई-गोवा महामार्गावरील उंबर्डे फाटयाजवळ वाशी नाका येथे असलेल्या म्हात्रेचाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार होती. त्यानुसार वेगवेगळे पथक करून सायंकाळी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी 5 वाजता सापळा रचून आरोपीचा पाठलाग करत बिबटयाचे सुकलेले कातडे व एक मोटार सायकल जप्त केली. गुन्हयातील संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई अलिबाग वन विभाग व डब्ल्यूसीसीबी, डब्ल्यूआर, नवी मुंबई यांनी संयुक्तरीत्या केली असून अलिबाग वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (भा.व.से) आणि डब्ल्यूसीसीबीचे उपसंचालक योगेश वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक गायत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पेण वनक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व फिरते पथक तसेच अलिबागमधील वनरक्षक व चालक उपस्थित होते.
वन्य प्राण्यांची शिकार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्हयात आरोपींना तीन ते सात वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा होते. नागरिकांनी अंधश्रध्दा व अमिषांना बळी पडू नये. वन्य प्राण्यांच्या तस्करी करणाऱ्यांची माहिती वन विभागाकडे दयावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. वन्य प्राणी तस्करीसह त्याची कातडी विक्री प्रकरणी वन विभागाकडून सखोल तपास केला जात आहे.
– गायत्री पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, अलिबाग