राज्यात परीवर्तन होणार- सरचिटणीस जयंत पाटील


| प्रमोद जाधव | स्व. गणपतराव देशमुख नगरी, पंढरपूर |

शेतकरी कामगार पक्ष आता नव्या जोमाने काम करणार आहे. पक्षाने 70 टक्के तरुणांना चिटणीस मंडळात सहभागी करुन घेतले आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. भविष्यात राज्यात परिवर्तन होणार, हे नक्की. येणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा असेल. येणार्‍या काळात आमूलाग्र बदल घडेल, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. पंढरपूर येथे अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी समारोप भाषणात ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचवा, अशी भावनिक साद घालून जनतेशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

यावेळी माजी आ. संपतबापू पवार पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, प्राध्यापक एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापचे नेते सुरेश खैरे, प्रीतम म्हात्रे, रायगड बाजार चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, वैशाली पाटील, प्रिया वेलणकर, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, देवा पाटील, प्रदीप नाईक तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा चिटणीस, तालुका चिटणीस, शेकापच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी उपस्थित होते.

आज शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप ज्येष्ठ नेते संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचा आनंद आहे. एक जाणकार अनुभवी नेता या अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. जनशक्तीच समाजाचे परिवर्तन करू शकते, हे आजच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भविष्यात देशांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने परिवर्तन होणार आहे. केंद्रातील सत्तेत डाव्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, महाराष्ट्रातदेखील डाव्या विचारांचा मुख्यमंत्री असणार आहे, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकरी कामगार पक्षाच्या संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. बदलत्या काळानुसार शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. शेकाप कात टाकणार आहे. 70 टक्के युवकांना संघटनेत संधी दिली आहे. पक्षात काम न करणार्‍यांना काढण्यात आले असून, प्रत्यक्ष काम करणार्‍यांना यावेळी संधी दिली. 2029 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत बदल होणार आहे. खासदारांची संख्या कमी आमदारांची संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. त्याची तयारी कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात करायला पाहिजे. विधानसभेत शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मोठे ताकदीने काम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचवा, अशी भावनिक साद घालून जनतेशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
सध्याची राजकीय परिस्थिती बिकट आहे. गोरगरिबांवर वेगवेगळे कर लादून त्यांना वेठीस धरण्याचे काम हे सरकार करत आहे. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. या शेतकर्‍यांच्या खतावरदेखील टॅक्स लावून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव आहे. हे सरकार शेतकर्‍यांचे कैवारी नाही, याची जाणीव करून दिली पाहिजे. देशामध्ये जातीनिहाय गणना झाली पाहिजे.

आरएसएसची विचारसरणी असलेला भाजपा पौराणिक काळापासून गोरगरिबांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आला आहे. सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्याची पुनरावृत्ती सध्या सुरू आहे. कुटुंबियांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचा या सरकारला विसर पडला आहे. देशामध्ये नीतीमत्ता राहिली नसून, संविधानदेखील धोक्यात येऊ लागले आहे.

देवेंद्र फडणवीससारखे गृहमंत्री असतानादेखील राज्यात अराजकता माजली जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारचे गुंडगिरी करणार्‍यांवर नियंत्रण राहिले नाही. नागरी सुरक्षेबरोबर महिला सुरक्षेचा प्रश्‍नदेखील गंभीर होऊ लागलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचे वाटोळे या सरकारने केले असून, महाराष्ट्राचे नाव खराब करून टाकले आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असून, गुंड भरदिवसा कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. देशासह राज्यात बहुजनांची सत्ता आली पाहिजे, शेती साधनांवरील असलेली जीएसटी अन्यायकारक असून, ती रद्द केली पाहिजे. या सरकारचे शेतीविरोधी धोरण आहे. या अंधाराला भेदून उद्याची पहाट ही आपलीच असणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

शेकापमध्ये खरं वैभव!
गेल्या काळात अनेकजण पक्ष सोडून गेले. मात्र, खचून न जाता नव्या उमेदीने काम करायचे आहे. मी 70 व्या वर्षात पदार्पण केले असले तरी चाळीशीत असल्यासारखं काम करणार आहे. टिंगल करणार्‍यांना आपण पक्षाची ताकद दाखवून देऊ. शेकापचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत. नव्या पिढीवर जबाबदारी दिली आहे. मात्र, पक्षासोबत गद्दारी करु नका. दुसर्‍या पक्षात नव्या नवरीसारखं दोन दिवस मान मिळेल. मात्र, शेकापमध्ये खरं वैभव आहे. इथे कार्यकर्त्यांना सन्मान आहे. आपल्याच लोकांनी गद्दारी केली म्हणून आपला पराभव झाला. मात्र, खचून जाऊ नका. उद्याची पहाट ही आपलीच आहे. शेकापला संघर्षमय इतिहास आहे. तो कुणीही पुसून टाकू शकत नाही, असे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
Exit mobile version