। जालना । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतांना देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान काल औरंगाबादच्या एका तरुणाने आपली चारचाकी पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच आज जालना येथील एकाने आपली दुचाकी पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आले. याचवेळी स्वराज्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष विकास जाधव याने स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल टाकत त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या मधोमध पेटवून दिली.
औरंगाबादेत तरुणाने स्वतःची कार पेटवली… शुक्रवारी (दि.१) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर याठिकाणी दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचं प्रकार समोर आला होता. मंगेश साबळे यांनी सुरुवातीला आपली कार रस्त्याच्या मध्यभागी आणून उभी केली. त्यानंतर खाली उतरवून पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच जालना येथील घटनेचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली.