उमरोलीतील घरफोडीत चोरट्यांच्या हाती धत्तुरा

अनोळखी तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील उमरोली खरवली येथील घरफोडी चोरी प्रकरणात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसून, यातील अनोळखी तीन चोरटे इसम सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सदरील गुन्हा दि. 6 जुलै रोजी सायंकाळी पाच ते दि.7 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद योगेश पांडुरंग मोरे (31) सध्या रा. वाकडाई नगर, माणगाव, मूळ रा.उमरोली, खरवली, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील तीन अज्ञात इसमांनी चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या उमरोली खरवली येथील मालकीचे घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट व लाकडी कपाट तोडून नुकसान करून तसेच घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अनोळखी चोरट्या इसमांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून, पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील शिरसाठ हे करीत आहेत.

Exit mobile version