। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शहरात व परिसरात लावण्यात येणार्या शुभेच्छा बॅनरच्या फ्रेम चोरीला जात आहेत. त्यामुळे या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
यावेळी सचिन मोदी, श्रेया कुंटे, गौतम जैन, शीतल नांगरे, सोनाली पडवळ, प्रियंका पिंपळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय काही दिवसांपूर्वीच नागोठण्याजवळील वाकण पुलावरील पोलादी पाईपचे रेलिंग लंपास करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे.
या चोरी प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय चोरट्यांना नागोठणे पोलिसांनी वेळीच जबर बसवली नाही तर भविष्यात नागोठण्यामध्ये जबरी चोरीची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.