| रायगड | खास प्रतिनिधी |
जालाना येथून सहलीसाठी आलेल्या 17 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने विद्यार्थ्यांच्यासोबत असलेल्या शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. सदर विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना शनिवारी (दि.4) रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर शनिवारी दुपारी विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. सहलीला आलेले विद्यार्थी हे पुढे नरवीर तानाजी मालुसरे स्मारक, चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रायगड किल्ला यासह अन्य पर्यटनस्थळांना भेट न देताच माघारी फिरले आहेत.
कोकणातील सर्वच प्रेक्षणीय स्थळांची भुरळ सर्वांनाच पडते. विशेष करुन रायगड जिल्ह्याकडे मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होत असतात. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलेला असतो. या कालावधीत पर राज्यातून तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. न्यू हायस्कूल वरुळ, घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहल सिद्धटेक, बारामती, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे येत होती.
महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ले त्यासोबतच त्यांनी काही शीतपेय देखील प्यायले यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास होत होता. यासोबतच थंड वारे येत असल्याने महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी खिडक्या बंद केल्याने विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला होता. त्रास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सदरच्या शिक्षकांना सांगितले. त्यानंतर त्यांना पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनू डोईफोडे, लहान मुलांचे डॉक्टर पुल्ले, डॉक्टर अनिल काकड, डॉक्टर गुठठे, डॉक्टर राजेश शिंदे रूग्णालयात दाखल झाले. पोलादपूर तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.
शिवकन्या विजय बर्डे (15), वनिता गजानन साळवे (15), श्रावणी शालिग्राम देवमाने (15), तुषार समाधान कस्तुरे (15), सोहम समाधान सोलाट (15), ओम परसराम करडे (15), विशाल भागवत शेळके (9), पायल कवन परिहार (9), संकेत गजानन घुले (9), प्रथमेश गणेश लाहोरकर (15), शिवानी संजय डोंगरदिले (15), आरती माधव कर्डेल (15), समीक्षा सुनील वाकोडे (15),योगिता कृष्णा शेळके (15), आरुषी पुरुषोत्तम देवमाने (13), वैष्णवी शेषराव घायवट (16), ओम शंकर घायवट (14), अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.