मैदानात आयोजकांकडून तयारीला सुरुवात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार अलिबागमधील क्रीडाभवनमधील मैदानात रंगणार आहे. 9 ते 11 जानेवारी असे तीन दिवस होणार्या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात तयारीला सुरुवात झाली आहे. मैदान तयार करण्यापासून व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम वेगाने सुरु आहे. या स्पर्धेसाठी अवघे पाच दिवसच शिल्लक राहिले आहेत.
अलिबागकरांसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील क्रीडाप्रेमींना आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेटचा आनंद घरबसल्यादेखील घेता येणार आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरविला जाणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे पर्व असणार आहे. स्पर्धेत निमंत्रित सोळा संघ आहेत. त्यामध्ये साखरमधील प्रदिप स्पोर्ट्स, अलिबागमधील कुबेर इलेव्हन, अलिबागमधील यु.व्ही. स्पोर्ट्स, अलिबागमधील आर्यन स्ट्रायकर्स, अलिबागमधील फैझी इलेव्हन, नवगांवमधील रियांश इलेव्हन, वरसोली येथील त्रिश्राव्या इलेव्हन, आंबेपूरमधील एस.पी. सुपर प्लेअर्स, म्हात्रोळी येथील आद्य सप्लाअर्स, थळमधील एम.डी. वॉरिअर्स, नागाव येथील सिया वॉरिअर्स, साखरमधील नाखवा वॉटर स्पोर्टस्, अलिबागमधील ए.बी. ग्रुप, साखरमधील प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्ट्स, अलिबागमधील जे.डी. भार्गवी इलेव्हन, दिघोडीमधील अर्जून इलेव्हन या संघाचा समावेश आहे. नव्या 2025 वर्षाच्या सुरुवातीला अलिबागमध्ये क्रीडाभवन येथे 9 ते 11 जानेवारी अशी तीन दिवस नाईट क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
अलिबाग तालुका मर्यादित या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये, व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा प्रो लिंक स्पोर्ट्स व एफएच स्पोर्ट्सवरदेखील पाहता येणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे पाच दिवसच शिल्लक राहिले आहेत. तिसर्या दिवशी म्हणजे नऊ जानेवारीला सायंकाळी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची तयारी आयोजकांकडून सुरु करण्यात आली आहे.