। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत पोलीसांच्या मदतीने तंबाखू खाणार्यांना दणका देण्यात आला आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्या 72 जणांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करून त्यांच्याकडून 14 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात हे विभाग स्वतंत्र आहे. तंबाखू सेवन करणार्यांना रोखण्यासाठी शाळांपासून गावागावात सरकारी कार्यालयांपर्यंत अनेक ठिकाणी तंबाखू सेवनाच्या परिणामाची माहिती फलकाद्वारे दिली जात आहे. तंबाखू बरोबरोबरच धुम्रपानामुळेदेखील आरोग्यावर परिणाम होत असल्याची जनजागृती केली जात आहे. तरीदेखील जिलह्यामध्ये तंबाखूसह गुटखा, विमलसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री जिल्ह्यात ठिकठिकाणी होत आहे. अलिबागपासून वेगवेगळ्या ठिकाणी तंबाखू, गुटखा,व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची धंदे राजरोसपणे चालत आहेत. त्यामुळे तंबाखू खाणार्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग वाढण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. तरीही काही मंडळी विशेष करुन युवा मंडळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी जाऊ लागली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत सल्ला देणे. समुपदेशन करणे. मुख कर्करोगाची तपासणी करणे. अशा अनेक वेगवेगळे उपक्रम डॉ. विकास पवार, सुशील साईकर, आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयमार्फत जनजागृती केली जात आहे. तंबाखूचे सेवन करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा 2003 कलम चार नुसार आतापर्यंत 72 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन लाख 14 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले आहे.