भेंडखळपरिसरातील घटना, प्रशासनाचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढत्या औद्योगिकीकरणातील दुषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे किनार्यावरील खाडीतील व गावोगावच्या नाल्यातील पाणी दुषित होत असून येथील विविध जातींचे मासे हे मृत्यू अवस्थेत पडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. सदर घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, मत्स्य आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करत असल्याने अशा दुषित पाण्याच्या व मेलेल्या माशांच्या उग्र वासाने भेंडखळ गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गहन बनला आहे. उरण तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक प्रकल्पातील दुषित, केमिकल मिश्रीत दुषित पाणी हे समुद्राच्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे वारंवार समुद्रातील मासे हे नागाव, जसखार, धुतूम, चिर्ले, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनार्यावर मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मासेमारी करणार्या बांधवांवर उपासमारीचे संकट ओढावत आहे. त्यात समुद्रात, नाल्यात जाणार्या ज्वलनशील पदार्थांमुळे नागाव व जेएनपीटी परिसरात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा गंभीर समस्येकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, मत्स्य आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करत आहेत.
एकंदरीत मासे मृत्यूमुखी पडत असल्याने याचा फटका हा मासेमारी करणार्या बांधवांना सहन करावा लागत आहे. तसेच खाडीतील मेलेल्या माशांमुळे व खाडीतील दुषित केमिकल मिश्रीत पाण्याच्या उग्र वासाने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी महसूल व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भेंडखळ गावातील रहिवाशी करत आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
समुद्रातील व खाडीतील मासेमारीवर आप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या बांधवांवर सध्या उपासमारीचे संकट ओढावले आहे. तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, कोकण आयुक्त व रायगड जिल्हाधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि मासेमारी करणार्या बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी भेंडखळ गावातील सामाजिक कार्यकर्ते हरेश पाटील यांनी केली आहे.