विद्यालयातील चोरीप्रकरणी तिघे गजाआड

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील शासकीय अध्यापक विद्यालयातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. मांडवा सागरी पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास करून तिघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. यातील एकाला दोन दिवसाची पोलीस कोठडी व अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

देवांग गावंड (23), रफीक मोहम्मद व समशाद अब्दूल मज्जीद असे तीन आरोपींची नावे आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सासवणे येथील शासकिय अध्यापक विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून बंद होते. याचा फायदा घेत 19 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते 22 एप्रिलच्या दरम्यान शाळेच्या खोलीच्या दरवाजाचा कुलूप तोडून आरोपी देवांग गावंड हा आत घुसला. शाळेतील शैक्षणिक व अन्य साहित्य असे एकूण 18 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. हा मुद्देमाल आरोपी रफीक व समशाद या भंगार विक्रेत्यांना विकला. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चेतन म्हात्रे यांनी तपास करून या गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी (दि.24) अलिबाग येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने देवांग गावंड याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Exit mobile version