| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील नाडा गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये (प्रेत जाळण्याच्या) ठिकाणी नारळ, लिंबू, मानवी कवटी, अगरबत्ती, डमरु, पेटलेले नारळ, गोमूत्र, भागवा कपडा, शंख, लाकडाच्या छोट्या जुड्या, भस्माची डबी आदी साहित्य घेऊन आरोपी बिपीन अंबिका शर्मा, राजेश किसन म्हात्रे, प्रशांत राजेंद्र शिर्के, तिन्ही राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई हे पेण तालुक्याच्या पूर्व भागातील नाडा निंबारवाडी येथील नाडा गावच्या स्मशानभूमीत अघोरी जादुटोणा करण्यासाठी आले होते. मात्र, गावकर्यांच्या सतर्कतेमुळे ही मंडळी पोलिसांच्या हाती लागली.
नाडा गावच्या ग्रामस्थांना रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत काहीतरी चालले आहे, असा संशय आल्याने ग्रामस्थ एकत्र येऊन स्मशानभूमीत गेले, तेव्हा प्रथमदर्शनी सर्व प्रकार बघितल्यानंतर त्यांना जादूटोण्याचा काही तरी प्रकार चालू असल्याचा संशय आला. त्यांनी खातरजमा करण्यासाठी यातील आरोपी बिपीन शर्मा व राजेश म्हात्रे यांना विचारणा केली. त्यावेळी ते पळून जाऊ लागले, ग्रामस्थांनी अडविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी यातील आरोपीसह गाडी ताब्यात घेतली आणि पेण पोलीस ठाण्यास सर्व हकीकत कळविली. वेळेचा विलंब न करता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समर बेग हे आपली टीम घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपी आणि त्यांची गाडी ताब्यात घेऊन पेण पोलीस ठाण्यात आणले. सर्व शहानिशा करुन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याकरिता व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याकरिता गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.