रेल्वेच्या तीन पुलांची कामे प्रगतीपथावर

| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील कर्जत एंड कडील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात अनेक विकास कामे मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सुरू आहेत. सध्या नेरळ स्थानकात एक पादचारी पुल असून, आणखी तीन नवीन पादचारी पुलांची कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, नेरळ स्थानकातील एक पादचारी पूल हा पुढे स्काय वॉक म्हणून स्थानकाबाहेर जाणार आहे.

माथेरानकरिता नेरळ रेल्वे स्थानकात येणार्‍या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करावा, अशी मागणी आणि पाठपुरावा खा. श्रीरंग बारणे यांच्याकडून अनेक वर्षे सुरू आहे. नेरळ रेल्वे स्थानकात आणखी तीन नवीन पादचारी पूल बांधले जात आहेत. त्यातील मुंबई दिशेकडील पुलाचे काम वेगाने सुरू असून, हा पूल दीड ते दोन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. कर्जत दिशेकडे दोन नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून हाती घेण्यात आले आहेत.त्यात एक पादचारी पूल हा नेरळ रेल्वे स्थानकातून थेट नेरळ गावातील बाजारपेठ भागात असलेल्या मध्य रेल्वेच्या वाहनतळ तेथे उतरविला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्याचा फायदा नेरळ गावातील रहिवाशांना नेरळ पूर्व आणि नेरळ पश्‍चिम भागात जाण्यासाठी रेल्वे स्थानकातील फलाटावर न येता थेट बाहेर जाता येणार आहे. त्यामुळे नेरळमधील प्रवासी आणि जनता ही स्काय वॉक कधी होणार याची वाट पाहत आहे.

नेरळ स्थानकात अशाप्रकारे तीन नवीन पादचारी पुलांची निर्मिती होत असून, प्रवाशांना गर्दीच्या वेळी थांबून राहण्याची वेळ येणार नाही. दुसरीकडे या पादचारी पुलांमुळे नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे मार्ग ओलांडून जाण्याची समस्यादेखील दूर होऊ शकते आणि अपघाताचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते. त्यामुळे भविष्यात नेरळ रेल्वे स्थानक हे पादचारी पुलांचे स्थानक म्हणून ओळजले जाऊ शकते.

Exit mobile version